भिवंडी दि.७ ( गांवकरी TODAY NEWS ) समुद्रातील जलतरण मत्स्य प्रजातीतील कोट्यवधी रुपयांचे आर्थिक साधन म्हणून मिळणाऱ्या व्हेल माश्याच्या उलटीची विक्री करण्याच्या हेतूने तस्करी करणाऱ्या पालघर जिल्ह्यातील त्रिकूटाला नारपोली पोलिसांनी भिवंडीत सापळा रचून ताब्यात घेऊन अटक केली आहे.उमेश रमेश राठोड (२३ रा.वसई पश्चिम),पवनकुमार महाविर भार्गव (३४,रा.विरार पूर्व),स्वप्निल उत्तम पोवार (२४ रा.वसई) अशी अटक करण्यात आलेल्या त्रिकूटाची नावे आहेत.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,या तिघांनी आपसात संगनमत करून कोणत्याही प्रकारची कायदेशीर परवानगी न घेता ८५ लाख ४५ हजार २२० रुपये किमतीची व्हेल माशाची उलटी विक्री करण्याच्या हेतूने पालघरचे त्रिकुट भिवंडीतून जाणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.त्यानुषंगाने नारपोली पोलिसांनी ३ ऑक्टोबर रोजी मुंबई वाहिनीवरील मानकोली हद्दीतील मिनी पंजाब हॉटेलसमोर सापळा रचून आरोपींना ताब्यात घेतले.त्यानंतर भिवंडी वनपरिक्षेत्र अधिकारी पूजा शंतनू रकटाटे यांच्या फिर्यादीवरून तिघांच्या विरोधात वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ चे कलम ३९,४४,४८,४९(ब),५७,५१ सह भादंविच्या ३४ न्वये नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे.दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार,व्हेल माश्याच्या उलटीचा वापर सुगंधित द्रव्य व आयुर्वेदिक औषधांच्या निर्मितीसाठी केला जातो.त्यामुळे सदर उलटीची किंमत कोट्यवधी रुपयांमध्ये मिळत असल्याने या उलटीची तस्करीला प्रतिबंध असून हा दखलपात्र गुन्हा आहे.
