भिवंडी दि.७ ( गांवकरी TODAY NEWS ) भाजपा सोशल मीडियाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या प्रतिमेला रावणाचे शिर लावून त्यांचा फोटो नुकताच सामाजिक माध्यमांवर प्रसारित करण्यात आला होता.दरम्यान या भाजप सरकारच्या कृत्याच्या निषेधार्थ भिवंडी महापालिका मुख्यालयासमोर युवक काँग्रेसच्या वतीने संताप व्यक्त करण्यात येवून राहुल पाटील यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी सायंकाळी भाजपाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून निषेध आंदोलन करण्यात आले.दरम्यान याप्रसंगी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भाजपा सरकारच्या सोशल मीडियाचे बॅनर हातात घेऊन त्यांना आग लावीत त्याची होळी करत भाजपा सोशल मीडियाचा तीव्र निषेध दर्शवला.तर याप्रसंगी भाजपा सोशल मीडियाने ट्विटरवर राहुल गांधींच्या प्रतिमेला लावलेल्या रावणाच्या धडाच्या कृत्याचा निषेध व्यक्त करून राहुल गांधी हे रावणाच्या विचारांचे समर्थन करत नसून राम आणि रहीम यांच्या विचारांना मानून काम करत असल्याची प्रतिक्रिया युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली आहे.भिवंडी शहर युवक काँग्रेस अध्यक्ष राहुल पाटील,भिवंडी पश्चिम विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष दिनेश प्रजापती ,रेहाना अन्सारी, इक्बाल सिद्धिक, आलम शेख, पियुष पाटोळे, साई चिल्का, ब्रिजेश यादव,अमित ढेले आदींसह युवक काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
