भिवंडी तालुक्यातील सोनाळे-बापगाव रस्त्यावरील धुळखाडी येथील अरुंद पूल व खराब रस्त्याबाबत देवा ग्रुप संघटनेचे रवींद्र पाटील यांनी मागील काही वर्षापासून संबंधित कार्यालय येथे पत्रव्यवहार केला आहे. पण त्यांना समाधानकारक उत्तर मिळाले नसून
अरुंद पूल व खराब रस्ता विरोधात ते उपोषणाला बसत आहेत
पिसे-टेमघर येथून पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिन्या बापगाव ते सोनाळे सर्व्हिस रस्त्यावरील धुळखाडी नाल्यावरून स्टेम कडे येतात. सदर धुळखाडी ह्या पुलाची उंची व रुंदी फार कमी असल्यामुळे आणि सदर पुलाला संरक्षण भिंती नसल्यामुळे या रस्त्यावरून प्रवास करणा-या शेतकरी, कामगार आणि शाळेत जाणाऱ्या मुलांना आपला जीव मुठीत घेउन प्रवास करावा लागत आहे. याबाबत देवा ग्रुप संघटनेचे कार्यकर्त रविंद्र पाटील यांनी संबंधित अधिकारी यांना अनेक वेळा लेखी पत्रव्यवहार केला आहे.
त्यांच्या सततच्या पाठपुराव्याने मनपा ने दि.१९/०९/२०१८ रोजी सर्वसाधारण सभेत सदर धुळखाडी येथे बॉक्स टाईप कल्व्हट बांधण्यासाठी मंजुरी दिली होती. सदर कामाची निविदाही काढण्यात आली होती. परंतु ती निविदा सुद्धा आपल्या मनपा प्रशासनाकडून रद्द करण्यात आली. त्यानंतर वारंवार पाठपुरवा करून सुद्धा सदर धुळखाडी पुला चे काम आजतागायत प्रलंबित आहे.

सदर प्रकरणी मनपा प्रशासनाची उदासीनता लक्षात घेऊन रविंद्र पाटील हे मंगळवार दि. ०३ ऑक्टो. रोजी, ठाणे महानगरपालिका मुख्यालय, चंदनवाडी, ठाणे या ठिकाणी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करणार आहेत. त्यामुळे उपोषणा आधी मनपाने सदर कामाची निविदा काढून प्रलंबित असलेल्या कामाची प्रत्यक्ष सुरुवात करावी व येथील जनतेला दिलासा द्यावा. अशी मागणी देवा ग्रुप संघटनेकडून केली आहे. मनपा प्रशासनाकडून याबाबत कोणताही निर्णय न घेतल्यामुळे 3 ऑक्टोबर रोजीच्या उपोषणावर देवा ग्रुप संघटना ठाम असून या आंदोलनात निर्णय न झाल्यास या पेक्षा उग्र आंदोलन करणार असल्याचे मत देवा ग्रुप संघटनेचे अध्यक्ष सुजित ढोले व उपाध्यक्ष नितेश कासार यांनी व्यक्त केले.
