बोध कथा ,देवाचा मित्र

लेख

*
*************************
**
—————————————-

*कथा*

एक छोटी मुलगी रणरणत्या उन्हात पाणी भरून आपल्या घरी निघत होती. ऊन खूप होते. ती लहान मुलगी घामाघूम झाली होती. तीचे अनवाणी पाय भाजत होते. सारखी ती पाय वर-खाली करत होती. तरीही चिकाटी न सोडता तशा रखरखत्या उन्हात पाय भाजत असताना ती चिमुकली चालत होती. तीचे भाजणारे पाय बघून एका सज्जन माणसाला फारच वाईट वाटले. त्याने समोरच असलेल्या दुकानातून त्या मुलीसाठी एक चप्पल खरेदी केली आणि त्या मुलीला दिली. त्या मुलीला तो म्हणाला ही चप्पल घाल. तुला मी भेट देतोय. यामुळे तुझे पाय भाजणार नाहीत. मुलगी लहान होती. तीला त्याचे अप्रूप वाटले. तीने लगेचच चप्पल घालून बघितली. तीला खूप छान वाटले. ती आनंदी झाली. आनंदात त्या मुलीने त्या माणसाचा हात धरला व त्याला म्हणाली, “काका, तुम्ही देव आहात का?‘‘ या प्रश्नावर तो सज्जन गृहस्थ आपले दोन्ही हात कानाला लावून म्हणाला, “अरे नाही रे बाळा, मी देव नाही.‘‘ मुलगी पुन्हा तशीच निरागस हसली म्हणाली, “काका – तुम्ही देव नाही मग नक्कीच देवाचे मित्र असणार.‘‘ मी कालच देवाला प्रार्थना केली होती. माझे पाय खूप भाजतात. मला चप्पल हवीय. देवानेच तुम्हाला पाठवले. तुम्ही देवाचे मित्रच असणार, हे वाक्य ऐकताच त्या सज्जन माणसाने त्या मुलीला जवळ घेऊन दोन वाक्ये बोलून तेथून त्या मुलीचा निरोप घेतला. संपूर्ण वाटेत त्या सज्जन माणसाच्या मनात एवढाच विचार घोळत होता, आपल्याला देव होता येत नाही; पण देवाचा मित्र होणे मात्र सहज शक्य आहे. खरोखर मित्रांनो आपल्यापैकी कुणीही देवाचा मित्र होऊ शकतो.

*बोध*

*स्वामी विवेकानंद म्हणायचे ज्याला चालत्या-बोलत्या माणसातला देव कळत नाही, त्याला दगडातला देव काय कळणार?*

*देवाचा मित्र व्हा*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *