मुंबई – नाशिक महामार्गावर ट्रकची ५ वाहनांना धडक :रिक्षाचालकासह दुचाकीस्वार जखमी

भिवंडी


भिवंडी दि.२८ ( गांवकरी TODAY NEWS ) मुंबई – नाशिक महामार्गावर भरधाव वेगात येणाऱ्या ट्रकने क्रॉसिंगवर उभ्या असलेल्या ५ वाहनांना जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात रिक्षा चालकासह दुचाकीस्वार जखमी झाल्याची घटना सोमवारी रात्रीच्या सुमारास तालुक्यातील येवई नाक्यावर घडली आहे.या अपघातात रिक्षाचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे.तर दुचाकीचे किरकोळ नुकसान झाले आहे.दरम्यान या अपघाताची नोंद तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली असून आयशर ट्रक चालकाच्या विरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याकूब वहिद कुरेशी (४४ रा.कल्याण) असे अपघातात गंभीर जखमी झालेल्या रिक्षा चालकाचे नाव असून त्याच्यावर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.तर कुंदन रमेश सेन असे किरकोळ जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे.दरम्यान घटनेनंतर ट्रक चालक फरार झाला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,सोमवारी २५ सप्टेंबर रोजी रात्री ९ वाजताच्या सुमारास येवई नाका क्रॉसिंगवर मोटारसायकल क्र.एमएच ०४ बीव्ही २८३३,अल्टो कार क्र.एमएच ०४ जीयु ७९७७,स्कॉर्पिओ क्र.एमएच ०४ एलएच २६८५,आयशर टेम्पो क्र.जीजे १५ एव्ही ३७६१,ऑटो रिक्षा क्र.एमएच ०५ सीजी ५१२६ अशी पाच वाहने उभी होती.त्यावेळी सदर वाहनांच्या पाठीमागून आयशर टेम्पो क्र.जीजे १६ एबी ५२०८ वरील चालकाने त्याच्या ताब्यातील टेम्पो वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून टेम्पो भरधाव वेगात चालवून सर्व वाहनांना जोरात धडक दिली.या अपघातात रिक्षा दोन्ही ट्रकच्या मध्ये सापडल्याने रिक्षाचा चेंदामेंदा झाला असून दुचाकीचे किरकोळ नुकसान झाले आहे.मात्र अपघाताची स्थिती पाहता रिक्षा चालक गंभीररित्या जखमी झाला आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.सुदैवाने दुचाकीस्वाराला किरकोळ स्वरूपाची दुखापत झाली आहे.या अपघातात इतर वाहनांचेही थोड्या प्रमाणात नुकसान झाले आहे.घटनेनंतर ट्रक चालक फरार झाला असून तालुका पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत सदर गंभीर अपघाताच्या अनुषंगाने ट्रक चालकाच्या विरोधात तालुका पोलीस ठाण्यात भादंविच्या कलम २७९ सह मो.वा.का कलम १८४,१८७ न्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू केला असता,अपघातातील धडक देणारा ट्रक गुजरातच्या मालकाचा असल्याने पोलिसांनी त्याच्याशी संपर्क साधून ट्रक चालकाला लवकरच ताब्यात घेऊन अटक करण्यासाठी पोलीस पथक गुजरातला रवाना होणार असल्याची माहिती या अपघाताचे तपासिक अधिकारी एएसआय बी.व्ही अवरारे यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *