भिवंडी दि.२६ ( गांवकरी TODAY NEWS ) चुळत भावाने बनावट कुलमुखत्यार पत्र तयार करून त्याआधारे वडिलोपार्जित जमिनीचे अन्य ६ साथीदारांच्या संनगमताने हस्तांतरण करून चुळत बहिणीची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना भिवंडीतून समोर आली आहे.या फसवणूक प्रकरणी बहिणीच्या फिर्यादीवरून ७ जणांच्या विरोधात नारपोली पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यामधील एकास पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली आहे.चुळत भाऊ जितेंद्र जयवंत परब व त्याचे साथीदार गोरख मदन थळे,फुलाजी तुकाराम गायकवाड,जयहिंद मोतीराम पाटील,राजेश मोरारजी ठक्कर,वसीम निसार मस्ते,उमेश हरिश्चंद्र माळी अशी गुन्हा दाखल झालेल्या सात भामट्यांची नावे असून यामधील वसीम निसार मस्ते यास पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,फिर्यादी बहीण अनिता प्रभाकर परब ही वसई पश्चिमेतील मानिकपूर येथील चुळना रोड गोकुळ नगरीतील अशोका कॉम्प्लेक्समध्ये राहत आहेत.तर तिचा चुळत भाऊ आरोपी जितेंद्र परब हा मानिकपूर परिसरातील परब चाळीत राहत आहे.दरम्यान अनिताची भिवंडीतील वेहळे येथे सर्व्हे नं.५२/२,१०३/२ व सारंगगावात सर्व्हे नंबर ४७/६,४७/११,४७/१७,४०/४ अशी वडिलोपार्जित जमीन आहे.सदर जमीन जितेंद्रने आमिषापोटी १२ मे १९९८ ते १५ सप्टेंबर २०२३ या कालावधीत अन्य ६ आरोपींशी संगनमत करून परस्पर हस्तांतरण करून चुळत बहीण अनिताची फसवणूक केली आहे.त्यामुळे फसवणूक झाल्याची बाब लक्षात येताच अनिताने भिवंडीतील नारपोली पोलीस ठाणे गाठून ७ जणांच्या विरोधात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी भादंविच्या कलम ४२०,४६५,४६८,४७१,३४ न्वये गुन्हा दाखल करून निसार मस्ते यास २३ सप्टेंबर २०२३ रोजी अटक केली आहे.त्यास न्यायालयात हजर केले असता २५ सप्टेंबर पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.पुढील तपास सपोनि विठ्ठल बढे करीत आहेत.
