भिवंडी दि.१८ ( गांवकरी TODAY NEWS )
काही दिवसांवर येवून ठेपलेल्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोनगाव पोलीसांनी कायद्याच्या चौकटीत राहून सण साजरा करण्यासाठी शुक्रवारी सायंकाळी भिवंडी पूर्व सहाय्यक पोलीस आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली विशेष मार्गदर्शन पर संयुक्त बैठकीचे आयोजन केले होते.यावेळी कोनगाव पोलीस ठाणे हद्दीतील गणेश उत्सव मंडळांचे पदाधिकारी, शांतता कमिटी सदस्य, पोलीस कर्मचारी, पोलीस पाटील आदींची उपस्थिती होती.दरम्यान मंडळांनी स्थानिक प्रशासनाच्या पूर्व परवानगी घेऊन उत्सव साजरा करावा,शक्यतो शाडूची मूर्ती स्थापना करावी,गर्दीचे भान ठेवण्यासह ध्वनी प्रदूषणाच्या नियमांचे पालन,नियमांप्रमाणे मंडप उभारणी,आगमनासह विसर्जनावेळी नियमांचे पालन,गणेशोत्सवात सीसीटीव्ही व स्वयंसेवक कार्यरत करावेत,दर्शनाकरिता महिलांसाठी वेगळी रांग करावी,वादग्रस्त किंवा आक्षेपार्य गाणी वाजवू नयेत,देखावा उभारताना व आगमन,विसर्जन सोहळ्यावेळी अन्य धर्मियांच्या भावना दुखावू नये.यासह आपल्या आरोग्याची काळजी घेऊन शासनाच्या निर्देशांचे पालन करीत प्रशासनास सहकार्य करून गणेशोत्सव भक्तिमय वातावरणात साजरा करण्याबाबत पोलिसांनी मार्गदर्शन केले.सदर बैठकीस पोनि (गुन्हे) दीप बने ,कोनगाव पोलीस ठाण्याचे सपोनि,पोउनि, शांतता कमिटी सदस्य, पोलीस कर्मचारी,गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी पोलीस पाटील असे एकूण ५५ ते ६० सदस्य उपस्थित होते.
