भिवंडी दि.१६ ( गांवकरी TODAY NEWS ) कपड्याची हातगाडी लावण्यावरून झालेल्या वादाच्या वैमनस्यातून चार मित्रांनी आपसात संगनमत करून शिलाई कामगारासह त्याच्या मित्रास शिवीगाळ करून शॉकअपसर व लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना भिवंडीतून समोर आली आहे.याप्रकरणी शांतीनगर पोलीस ठाण्यात चार मित्रांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अरसलान अन्वर चौधरी व त्याचे अन्य तीन मित्र अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.तर अफताब आलम मोहमद हारून अन्सारी व त्याचा मित्र अमन अन्सारी अशी मारहाण झालेल्या दोन मित्रांची नावे आहेत.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,आरोपी चारही मित्र भिवंडीतील कसाईवाडा परिसरात राहत आहेत.तर मारहाण झालेले दोघे मित्र अन्सार मोहल्ल्यात राहत आहेत.दरम्यान या मारहाणीच्या घटनेपूर्वी अन्सार मोहल्ला परिसरात कपड्याची हातगाडी लावण्यावरून फिर्यादी व त्याचा मित्र चहा पित असताना दोघांशी आरोपीच्या गटाने शाब्दिक बाचाबाची करून वाद केला होता.त्यावेळी मोहल्ल्यातील नागरिकांनी भांडण सोडवले होते.त्यानंतर हा वाद १३ सप्टेंबर रोजी रात्री साडे दहा वाजताच्या सुमारास उफाळून आल्याने त्या वादाच्या वैमनस्यातून आफताब व त्याचा मित्र अमन हे दोघे मेट्रो हॉटेल समोर बसलेले असताना आरोपी अरसलान ह्याने त्याच्याजवळील शॉकअपसरने आफताबच्या कपाळावर मारून तर अन्य तीन आरोपींनी आपसात संगनमताने अमनला शिवीगाळ करीत लाकडी दांडक्याने त्याच्या डोक्यावर मारून दोघांना गंभीर जखमी केले आहे.याप्रकरणी आफताबच्या फिर्यादीवरून चौघांवर शांतीनगर पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोह अनिल शिरसाठ करीत आहेत.
