भिवंडी दि.६ ( गांवकरी TODAY NEWS ) विवाहिता सासरच्या मंडळी विरोधात पोलीस ठाण्यासह भिवंडी न्यायालयात गेल्याने पतीसह सासू सासऱ्याने विवाहितेला शिवीगाळ करीत बेदम मारहाण केल्याची घटना भिवंडी न्यायालयाच्या आवारातून समोर आली आहे.याप्रकरणी विवाहितेने पतीसह सासू सासऱ्याच्या विरोधात शांतीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.पती अतुल मुन्नेलाल चौधरी (३४),सासरे मुन्नेलाल चौधरी (६५),सासू यशोदा चौधरी (५५) अशी गुन्हा झालेल्या सासरच्यांची नावे आहेत.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,भिवंडीतील ३४ वर्षीय पीडित विवाहितेचा अतुल याच्याशी लग्न झाला असून ती पती व सासू,सासऱ्यासह पनवेलमधील एका इमारतीत राहत होती.मात्र सासरच्या छळाला कंटाळल्याने पीडित विवाहितेने भिवंडीतील शांतीनगर पोलीस ठाण्यात सासरच्यां विरोधात तक्रार दाखल केली आहे.दरम्यान पीडित विवाहिता ४ सप्टेंबर रोजी सासरच्या मंडळीच्या विरोधातील पोलीस ठाण्यातील दाखल तक्रारीच्या अनुषंगाने भिवंडी न्यायालयात गेली होती.मात्र सदर बाब सासरच्यांच्या लक्षात आल्याने पतीसह सासू,सासऱ्याने आपसात संगनमत करून विवाहितेला न्यायालयाच्या गेटसमोरच अडवून प्रथम पतीने विवाहितेला शिवीगाळ करीत हाताच्या चापटीने मारहाण केली.त्यानंतर सासू यशोदा हीने पीडितेच्या डोक्यावर छत्रीने मारून जखमी केले आहे.तसेच या सर्वांनी विवाहितेला खटला चालवल्यास धमकीही दिली आहे.त्यामुळे पीडितेने शांतीनगर पोलीस ठाण्यात तिघांच्या विरोधात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी सासरच्यांवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास पोह जांजर करीत आहेत.
