भिवंडी दि.६ ( गांवकरी TODAY NEWS ) मयत व्यक्तीच्या नावाने बनावट कुलमुखत्यारपत्र तयार करून पती पत्नीने व्यापाऱ्याच्या जमिनीचा अपहार केल्याची खळबळजनक घटना भिवंडी दुय्यम निबंधक कार्यालयातून उघडकीस आली आहे.या फसवणूक प्रकरणी व्यापाऱ्याने पती पत्नीवर शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.बशीर अहमद मोहरम अली अन्सारी,हुसना बानो अन्सारी अशी गुन्हा दाखल झालेल्या पती पत्नीची नावे आहेत.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,फिर्यादी अमर मोहन मखीजा (५५) हे व्यापाऱ्याचा व्यवसाय करीत असून त्यांचे वडील मोहन तहेलराम मखीजा हे सन २०१० साली मयत झाले आहेत.मात्र असे असताना आरोपी पती पत्नीने आपसात संगनमत करून बनावट कुलमुखत्यारपत्राच्या आधारे मौजे नागाव येथे ठाणे सर्व्हे नं.९०/१/ब/२ येथील १ हेक्टर २४ पैकी १५ ही जमीन पती बशीरने दुय्यम निबंधक कार्यालयात खोट्या दस्तावेजाच्या आधारे ४ मार्च २०२१ रोजी पत्नी हुसना बानो हिला विक्री केल्याचे भासवले.त्यानंतर बशीरने बनावट कुलमुखत्यार पत्राच्या सहाय्याने हुसनाबानोच्या नावे सातबारा रद्द झालेला असतानाही अताउल्लाह हाजी अब्दुल मजीद अन्सारी व इतरांना सदर जमिनिपैकी ५०० चौ वार प्रति ४००० रुपये प्रमाणे विक्री करून लोकांकडून पैसे घेऊन त्यांची फसवणूक केली आहे.तसेच फिर्यादी यांच्या जमिनीचा बनावट सातबारा,कुलमुखत्यार पत्राद्वारे परस्पर अपहार केला आहे.त्यामुळे या अपहारप्रकरणी व्यापाऱ्याच्या फिर्यादीवरून पती,पत्नी विरोधात शांतीनगर पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोनि (प्रशासन) निलेश बडाख करीत आहेत.
