भिवंडी दि.3 ( गांवकरी TODAY NEWS ) भिवंडी परिमंडळ-२ क्षेत्रातील नागरी आणि ग्रामीण भागातील सर्वात मोठे सीमावर्ती क्षेत्र असलेल्या नारपोली पोलीस ठाण्याने सन २०२२ मध्ये उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर ठाणे पोलीस आयुक्तालयात अव्वल क्रमांक पटकावला आहे. मंगळवारी ठाणे पोलीस आयुक्त जयजित सिंग यांनी नारपोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मदन बल्लाळ यांचा २५ हजार रुपये रोख आणि स्मृतिचिन्ह देऊन गौरव केला.ठाणे पोलीस आयुक्तालय परिसरात एकूण ३९ पोलीस ठाणी आहेत.या पोलिस ठाण्यांमध्ये वर्षभरात दाखल झालेल्या गुन्ह्यांची संख्या, गुन्ह्यांची उकल झालेली संख्या, कायदा व सुव्यवस्था, परिसरातील नागरिकांशी असलेले सौहार्दपूर्ण संबंध लक्षात घेऊन अनेक बाबी तपासल्या जातात.भिवंडीचे पोलिस उपायुक्त नवनाथ ढवळे, सहायक पोलिस आयुक्त किशोर खैरनार यांच्या मार्गदर्शनाखाली व वरिष्ठ पोलिस निरीक्षक मदन बल्लाळ यांच्या नेतृत्वाखाली नारपोली पोलिसांची कामगिरी उत्कृष्ट ठरली आहे.ज्यासाठी नारपोली पोलीस ठाण्याला प्रथम पारितोषिक मिळाले आहे. नारपोली पोलीस ठाण्याला सन २०२२ चा पुरस्कार मिळाल्याने अनेक नागरिक, सामाजिक संस्थांचे पदाधिकारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक मदन बल्लाळ व पोलीस ठाण्यात कार्यरत सर्व पोलीस कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करत आहेत.पुरस्कार वितरण सोहळ्याला सहायक पोलिस आयुक्त दत्तात्रय कराळे, अतिरिक्त पोलिस आयुक्त डॉ.महेश पाटील, डॉ.पंजाबराव उगले, संजय जाधव यांच्यासह ठाणे शहर पोलिस आयुक्तालय क्षेत्रातील सर्व पोलिस अधिकारी उपस्थित होते.
