भिवंडी दि.1( गांवकरी TODAY NEWS ) रक्षाबंधनाकरिता बहिणीची वाट बघत बिल्डिंगखाली उभ्या असलेल्या तरुणाकडे त्याच्या ओळखीच्या ईसमाने कॉलिंगसाठी मोबाईलची मागणी केली असता,तरुणाने त्यास नकार दिल्याच्या रागातून संतापलेल्या माथेफिरुने त्याच्याकडील टोकदार हत्याराने वार करून तरुणास गंभीर जखमी केल्याची घटना बुधवारी सकाळी भिवंडीत घडली आहे.
या हमल्याप्रकरणी माथेफिरूवर भोईवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आसिफ उर्फ कैरी असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,बुधवारी ३० ऑगस्ट रोजी रक्षाबंधनाच्या निमित्ताने बहीण घरी राखी बांधण्याकरिता येणार असल्याने १८ वर्षीय भाऊ रोहित रविशंकर यादव हा तो राहत असलेल्या बालाजी नगरमधील प्रकाश टावरे इमारतीखाली सकाळी १०:३० च्या सुमारास वाट पाहत असताना आरोपी आसिफ त्यावेळी तिथे आला असता,त्याने रोहितकडे एक कॉल लावण्याकरिता मोबाईल मागितला.परंतु रोहितने त्यास मोबाईलमध्ये रिचार्ज नसल्याचे सांगत मोबाईल देण्यास नकार दर्शवला,दरम्यान याच रागातून आसिफने त्याच्याकडील टोकदार शस्त्राने रोहितच्या दंडावर वार करून त्यास गंभीर जखमी केले आहे.याप्रकरणी रोहितच्या फिर्यादीवरून भोईवाडा पोलीस ठाण्यात आसिफच्या विरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोऊनि ए.सी.राठोड करीत आहेत.