भिवंडी दि.३० ( गांवकरी TODAY NEWS ) भिवंडीला वीज पुरवठा करून त्याची वीजबिले वसुली करणाऱ्या टोरेंट पावर या कंपनीच्या मनमानी कारभारा विरोधात शुक्रवारी १ सप्टेंबर २३ रोजी महाविकास संघर्ष समितीच्या वतीने दुपारी २:३० वाजता मोर्चा काढणार असल्याची माहिती समितीच्या वतीने अजयनगर येथील शिवसेना कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.या पत्रकार परिषदेसाठी समितीचे अध्यक्ष रुपेश म्हात्रे, माजी खासदार सुरेश टावरे, दयानंद चोरघे,अशोक पाटील, शोएब गुड्डू, सुरेंद्र मुळे, मनोज गगे आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी टोरेंट पावरच्या कारभाराबाबत विविध तक्रारीचा पाढा उपस्थितांनी मांडला.
भिवंडीतील तत्कालीन परिस्थितीमुळे टोरेंट कंपनीला भिवंडीची फ्रॅन्चायसी देण्यात आली. मात्र २०१४ पर्यंत या कंपनीचा कारभार चांगला होता. मात्र भाजप सरकार आल्यानंतर या कंपनीचा मनमानी कारभार सुरु झाल्याचा आरोप काँग्रेसचे माजी खासदार सुरेश टावरे यांनी केला आहे.तर भिवंडीत वीजबिल वसुली ९० टक्के होत असल्याने वीज चोरी होत नसून वीज चोरीच्या केसेस चुकीच्या रीतीने होत असल्याचा आरोप शिवसेनेचे माजी आमदार रुपेश म्हात्रे यांनी केला.तर राज्यातील शेतकऱ्यां प्रमाणे भिवंडीत देखील वीजदरवाढीने आत्महत्या करावी,असे शासनास वाटते काय ?असा प्रश्न काँग्रेसचे दयानंद चोरघे यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला.शासनाने नियुक्त केलेल्या एमएसईडीसीएलने राज्यातील इतर जिल्ह्याच्या वीज दरापेक्षा भिवंडीमध्ये वीजदर जास्त का आकारले आहेत, वीजचोरीच्या केसेस करताना लोकप्रतिनिधी अथवा सरकारी विभागातील कर्मचारी सोबत असावा, मीटरचा टेस्ट रिपोर्ट देण्यात यावा, वीजग्राहकांना ३०० युनिट वीज फ्री मिळावी, टोरेंट पॉवरने एमएसईडीसीएलच्या करारा प्रमाणे कारभार करावा तसेच हे कार्यालय सोमवार ते शनिवारपर्यंत सुरु ठेवावे,थकीत बिलावरील व्याज माफ करावे अशा विविध मागण्यांसाठी येत्या शुक्रवारी हा मोर्चा शिवाजी चौक ते टोरेंट पॉवर कार्यालयापर्यंत निघणार असल्याची माहिती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.