गुजरातच्या एमडी पावडर तस्कराला भिवंडी गुन्हे शाखेने ठोकल्या बेड्या

भिवंडी


भिवंडी दि.११ ( गावंकरी TODAY NEWS ) गुन्हे शाखा घटक -२ च्या पोलिसांनी भिवंडीच्या रांजणोली नाका येथून एमडी पावडर तस्कराला अटक केली आहे.त्याच्याकडून पोलिसांनी ४ लाख ५५ हजार रुपये किमतीची ६५.७८ ग्रॅम मॅफेड्रॉन (एमडी) पावडर जप्त केली आहे.अस्लम अब्दुल कादिर समा (३८ रा.भूज,गुजरात) असे अटक करण्यात आलेल्या एमडी पावडर तस्कराचे नाव आहे.तर तो गुजरात राज्यातून येवून एमडी पावडरची विक्री करण्यासाठी भिवंडीत ग्राहक शोधत असल्याची माहिती गुन्हे शाखेने दिली आहे.भिवंडीत अमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या समाजकंटकांवर कारवाईचे आदेश उच्च पोलीस अधिकाऱ्यांनी दिल्यानंतर गुन्हे शाखेने विशेष पथक तयार केले असून ते मोहिमे राबवून कारवाईत गुंतले असल्याची माहिती भिवंडी गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक धनराज केदार यांनी दिली.दरम्यान गुन्हे शाखेच्या पोलिसांना गुप्त बातमी दारामार्फत, मुंबई-नाशिक महामार्गावरील रांजनोली नाक्यावर मेफेड्रान (एमडी) पावडर विकण्यासाठी तस्कर येणार असल्याची माहिती मिळाली होती.या माहितीवरून गुन्हे शाखा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सचिन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि विजय मोटे,सपोनि धनराज केदार,रामचंद्र जाधव, पोलीस हवालदार प्रकाश पाटील, सचिन साळवी, मंगेश शिरवे, शशिकांत यादव, शाबीर शेख, पोना सचिन जाधव, रोशन जाधव, प्रशांत बर्वे, अमोल इंगळे, रवींद्र साळुंखे आदी गुन्हे शाखेच्या पथकाने ९ ऑगस्ट रोजी दुपारी दीड वाजता नाशिककडे जाणाऱ्या रस्त्यावरून संशयाच्या आधारे रांजणोली नाक्याजवळील वाहतूक पोलिस चौकीजवळ सापळा रचून एका व्यक्तीला पकडले.त्याच्याकडून ४ लाख ५५ हजार रुपये किमतीची ६५.७८ ग्रॅम मॅफेड्रॉन पावडर जप्त करण्यात आली आहे.याप्रकरणी आरोपीत अस्लम याच्या विरोधात कोनगाव पोलीस ठाण्यात एनडीपीसी कायद्याच्या कलम ८(अ), २२(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास गुन्हे शाखा घटक -२ चे पोलीस करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *