भिवंडी दि.११( गावंकरी TODAY NEWS ) शिवसेना ठाकरे गटाने नुकतीच मुंबई रेल्वे महाप्रबंधक अजय मिश्रा यांची मुंबई कार्यालयात भेट घेऊन भिवंडीकरांसाठी प्रतितासाला छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते भिवंडी रोड स्टेशन पर्यंत लोकल ट्रेन सेवेची मागणी करून भिवंडी तालुक्यातील जनतेच्या प्रवासाची गैरसोय दूर होण्यासाठी चंग बांधून ८० टक्के समाजकारणाचा वसा यागोदरच घेतला होता.त्यानुषंगाने पुन्हा ठाकरे गटाच्या शिष्टमंडळाने शिवसेनेचे खासदार तथा सचिव विनायक राऊत यांच्या नेतृत्वाखाली भिवंडीवासियांच्या मूलभूत रेल्वे सेवा प्रश्नासंदर्भात दिल्ली शिवसेना संसद भवनात बुधवारी केंद्रीय रल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन भिवंडीतील नागरिकांना वाहतूक कोंडीमुळे होणारा त्रास रेल्वे प्रशासनाने मुंबई ते भिवंडी रोड रेल्वे सेवेच्या माध्यमातून दूर करण्यासाठी सविस्तर चर्चा करून निवेदन सादर केले आहे.दरम्यान रेल्वे मंत्र्यांनी तात्काळ निवेदनाची दखल घेऊन मुंबई ते भिवंडी रेल्वे सेवा सुरू करण्यासाठी रेल्वे अधिकाऱ्यांशी चर्चा करून याबाबत ठोस निर्णय घेण्याचे आश्वासन ठाकरे गटाच्या शिष्टमंडळाला दिले आहे.

त्यानंतर ठाकरे गटाच्या शिष्टमंडळाने खासदार संजय राऊत यांचीही दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन मुंबई ते भिवंडी रेल्वे सुरु करण्यासाठी निवेदन देऊन चर्चा केली.त्यावेळी संजय राऊतांनीही रेल्वे मंत्र्यांशी याबाबत चर्चा करण्याचे आश्वासन देऊन संघटनात्मक चर्चा केली.त्यामुळे भिवंडी तालुक्यातील नागरिकांची वाहतूक कोंडीने होणारी फरपट थांबण्याच्या आशा काही अंशी पल्लवित झाल्या असून रेल्वे मंत्र्यांच्या भेटीवेळी ठाकरे गटाचे शहर प्रमुख प्रसाद भाई पाटील,शहर सचिव महेंद्र कुंभारे, विधानसभा संघटक उमेश कोंडलेकर, विधानसभा सचिव गोकुळ कदम आदी शिष्टमंडळ उपस्थित होते.तर मुंबई ते भिवंडी लोकल रेल्वे सुरु व्हावी, याकरिता ठाकरे गट लवकरच सह्यांची मोहीम राबविणार असल्याचे शहरप्रमुख प्रसाद पाटील यांनी प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना सांगितले आहे.
