मागील काही काळात चित्रपट सृष्टीमध्ये ‘बाहुबली’ च्या दोन्ही भागांसाह ,’पुष्पा द राईज – १’ या दक्षिणात्य चित्रपटांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले.दरम्यान महाराष्ट्रात नुकत्याच ३० जून २०२३ रोजी प्रदर्शित झालेल्या ‘बाईपण भारी देवा’ या मराठी चित्रपटाने महिला वर्गामध्ये अल्पावधीतच एक वेगळी क्रेझ निर्माण केली आहे.त्यातच भिवंडी तालुक्यातील शहरी भागासह ग्रामीण भागातील महिलांनी या चित्रपटाला चांगली पसंती दिली असून आतापर्यंत या चित्रपटासाठी महिलांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचे चित्रपट गृहाच्या माध्यमातून दिसून आले आहे.विशेषतः महिला वर्गासाठी प्रदर्शित करण्यात आलेल्या ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाला महिला प्रेक्षक वर्गातून चांगला प्रतिसाद मिळत असून ‘चूल’ आणि ‘मूल’ या थेरीमध्ये गुंतून राहिलेल्या महिलांनी कामातून क्षणभर विश्रांती घेत भिवंडी महानगरपालिका अखत्यारीतील हसीन – फरान या चित्रपट गृहात जाऊन या चित्रपटाचा मनसोक्त आनंद लुटला.तर यावेळी महिलांमध्ये चित्रपटाच्या पोस्टरलगत फोटो काढण्याकरिता झुंबड उडाल्याची माहिती एका महिला प्रेक्षकाने प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना दिली.
