भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेतील नगररचना विभागातील कार्यरत कनिष्ठ अभियंता अविनाश कारभारी चव्हाण यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) मार्फत नगररचनाकार वर्ग-१ या पदासाठी घेतलेल्या परिक्षेमध्ये चांगल्या गुणांनी पास होऊन यश संपादन केल्याबद्दल महापालिकेचे प्रशासक तथा आयुक्त विजयकुमार म्हसाळ यांनी पुष्पगुच्छ देऊन महापालिकेतर्फे सत्कार करुन अभिनंदन करीत, त्यांच्या भविष्यातील प्रशासनातील वाटचालीस शुभेच्छा व्यक्त केल्या. यावेळी अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे आणि उप-आयुक्त दीपक झिंजाड हे ऊपस्थित होते…

या यश संपादनाबाबत कनिष्ठ अभियंता अविनाश कारभारी चव्हाण यांना छेडले असता, त्यांनी सांगितले की, मी भिवंडी महापालिकेमध्ये गेल्या १५ वर्षांपासून नगररचना विभागांत काम करीत असतांना येथील कामाचा प्रत्यक्ष घेतलेला अनुभव खुपच फायदेशिर ठरलेला आहे. मी शासनाकडील अनेक अनुभवी सहाय्यक संचालक, नगररचनाकार यांचकडे काम केल्याने अशा अनुभवी अधिका-यांचे मला मिळालेले मार्गदर्शन आणि नगररचना विभागातील जेष्ठ व अनुभवी सहका-यांनी नेहमीच केलेले मनापासूनचे सहकार्यही मला तितकेच महत्वाचे आहेत, त्यामुळे मला या परिक्षेत यश संपादन करणे सोपे झाले.
कनिष्ठ अभियंता यांच्या परिक्षेतील यश संपादनाबाबत उपस्थित कर्मचा-यांनी प्रतिक्रीया देतांना सांगितले की, चव्हाण हे या महापालिकेमध्ये अत्यंत जबाबदारीने काम करतांना, त्यांनी एमपीएससी मार्फत नगररचनाकार, वर्ग-१ यासाठीच्या परिक्षेत चांगले यश संपादन केले आहे. ही गोष्ट आमच्या सर्व महापालिका अधिका-यांना अभिमानास्पद अशीच आहे, असे गुणवत्ताधारक अधिकारी वर्ग या भिवंडी महापालिका सेवेत आहेत, याचा आम्हांला सार्थ अभिमान आहे. महापालिका सेवेतून आता त्यांच्यासारखा मेहनती आणि तितक्याच जबाबदारीने काम करणारे अभ्यासू अभियंता चव्हाण आता शासनसेवेत कामावर रुजू होणार असल्याने उपस्थित सर्व अधिकारी, कर्मचा-यांनी आनंद आणि समाधानही व्यक्त केला आहे.
