अनिल गजरे.
भिवंडी दि.३०( गावकरी TODAY NEWS ) कल्याण – भिवंडी वाहिनीवरील रांजणोली नाका ब्रिजखाली गांजाची वाहतूक करणाऱ्या दोघांना भिवंडी गुन्हे शाखा घटक – २ च्या पथकाने छापा टाकून शिताफीने ताब्यात घेऊन अटक केली आहे.प्रसाद संतोश चौवले (२६ रा.कामतघर,भिवंडी) व किरण भक्तया कोंडा (२७ रा.भिवंडी) अशी अटक करण्यात आलेल्या दोघा गांजा तस्करांची नावे आहेत.या दोघांच्या विरोधात कोनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली आहे.आरोपीत तस्करांकडून ११ लाख ५४ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,२७ मे २०२३ रोजी दोघे जण गांजा या अंमली पदार्थाची वाहनामधून वाहतूक करणार असल्याची खबर भिवंडी गुन्हे शाखा घटक -२ च्या पथकाला मिळाली होती,त्यामुळे गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि धनराज केदार,प्रफुल्ल जाधव, पोऊनि रविंद्र चौधरी,पोह सुनिल साळुंखे,सचिन जाधव, पोकॉ भावेश घरत,पोशि अमोल इंगळे,रोशन जाधव,रविंद्र साळुंखे या पोलीस पथकाने रांजणोली ब्रिजखाली सापळा रचला असता, छापा टाकून वरील आरोपींना कारसह ताब्यात घेऊन त्यांच्या कारची झाडझडती घेण्यात आली.त्यावेळी कारमध्ये ४१.१०० किलोग्रॅम वजनाचा गांजा,२ मोबाईल आणि रोख रक्कम मिळून आल्याने पोलिसांनी कारसह एकूण ११ लाख ५४ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करत गांजा तस्करांना बेड्या ठोकल्या आहेत.आरोपींवर एन.डी.पी.एस. कलम ८ (क) ,२२ (क) न्वये कोनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.या घटनेचा पुढील तपास गुन्हे शाखेचे सपोनि धनराज केदार करीत आहेत.
