—————————————-
आरोग्य सेवेतील महत्वाचा आधारस्तंभ # नर्स # यांना नर्स डे च्या गावकरी TODAY NEWS परिवारातर्फे हार्दिक शुभेच्छा..
लेखक – निलेश पवार
अनगाव, ता – भिवंडी, जि – ठाणे.
आज 12 मे, जागतिक नर्स डे म्हणजेच परिचारिका दिवस आहे. आधुनिक नर्सिंगचा पाया रचणाऱ्या फ्लॉरेन्स नाईटिंगेल यांचा 12 मे हा जन्मदिवस जागतिक नर्स डे (परिचारिका दिवस) म्हणून साजरा केला जातो. सर्व परिचारिकांचा गौरव व सन्मान करण्याचा आजचा हा दिवस आहे. त्या निमित्ताने नर्सचे (परिचारिकांचे) महत्व सांगणारा हा लेख.

फ्लॉरेन्स नाईटिंगेल यांचा जन्म 12 मे 1820 रोजी इटलीमध्ये झाला. 1854 मध्ये क्रिमियाचे युद्ध झाले. तेंव्हा ब्रिटिश सैनिकांना रशियातील क्रिमियामध्ये लढण्यासाठी पाठवले होते. त्या युद्धात अनेक सैनिक जखमी व मृत झाले होते. तेंव्हा फ्लॉरेन्स आपले परिचारिकांचे पथक घेऊन तिथे पोहोचल्या. त्यावेळी युद्ध भुमीवरची परिस्थिती अतिशय बिकट होती. परंतु फ्लॉरेन्स नाईटिंगेल यांनी जखमी व आजारी सैनिकांच्या सेवेसाठी दिवस रात्र एक केले. त्यामुळे सैनिकांच्या परिस्थितीत लक्षणीय सुधारणा झाली. फ्लॉरेन्स रात्रीच्या वेळी हातात लॅम्प (लालटेन)
म्हणजेच कंदील घेऊन तासन् तास रुग्णांची सेवा, मलमपट्टी, विचारपूस आणि देखभाल करत असत. त्यामुळे सैनिक त्यांना आदराने व प्रेमाने ‘ लेडी विथ लॅम्प ‘
म्हणायचे. त्यांनी युद्धभूमीवर केलेले कार्य अगाध आहे. फ्लॉरेन्स नाईटिंगेल यांनी आपले सर्व जीवन रुग्ण सेवेकरता अर्पण केले.

परिचारिका हा आरोग्य सेवेचा अविभाज्य व मूलभूत घटक आहे. वैद्यकीय सेवेत रुग्ण आणि डॉक्टर या दोघांना सांधणारा महत्वाचा दुवा म्हणजे परिचारिका. रुग्णालयातील पेशंटला वेळेवर गोळ्या, औषधे, इंजेक्शन देण्याची जबाबदारी नर्स व्यवस्थित पार पाडते. महिलेचे गरोदरपणातील उपचार असोत की तिची सुखरूप प्रसूती असो. सर्वच बाबतीत नर्स आघाडीवर कार्यरत असते. नर्समध्ये सेवा, समर्पण , निष्ठा, विनय , सहनशीलता , मृदू भाषा, रूग्नाविषयी सहानुभूती हे सारे गुण एकवटलेले असतात. या सर्व गुणांच्या मिलाफातून नर्स (परिचारिका) हे व्यक्तिमत्व तयार होते. रुग्णांची सेवा करणाऱ्या परिचारिकेला वेळेची तमा नसते आणि स्वतःच्या सुख – दुःखाचीही पर्वा नसते. जणू हॉस्पिटल आणि वॉर्ड हेच तिचे दुसरे घर असते.
कोरोनासारख्या महाभयंकर संकटकाळात परिचारिकांची भूमिका महत्वाची ठरली. आपल्या कुटुंबाची, मुलांची, प्रसंगी आपल्या जीवाची पर्वा न करता कोरोना बाधित रुग्णांच्या सेवेत या नर्सेस अहोरात्र झटत होत्या. जणू सीमेवरील जवानांप्रमाने त्यांनी आपले प्राण तळहातावर घेऊन कारोना रुग्णांची सेवा केली. त्यामुळेच कोरोनावर नियंत्रण मिळाल्याचे मोठे श्रेय डॉक्टरांसोबतच परिचारिकांना सुद्धा आहे. यातून ‘ रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा ‘ असते , हेच त्यांनी जगाच्या लक्षात आणून दिले.

खरे पाहता, रुग्णांवर मायेची फुंकर घालून त्यांची अहोरात्र सेवा करणाऱ्या परिचारिकांचे जीवन वाटते तितके सहज व सोपे नसते. त्यांचे जीवन नक्कीच कष्टमय आहे. पण अशातही स्वतःच्या आयुष्यातला काळोख विसरून रुग्णांच्या जीवनात आनंदाचा दिवा प्रज्वलित करण्यासाठी त्यांची अखंड धडपड सुरू असते. रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांशी गोड बोलून , त्याला धीर व सकारात्मकता देऊन ‘तुम्ही आजारपनातून लवकर बरे व्हाल ‘ असा आशावाद परिचारिका त्याच्यात निर्माण करतात. त्यांचे जीवन जणू रुग्णांच्या सेवेकरताच समर्पित असते. खरं तर परिचारिकांचे योगदान शब्दात वर्णन करणे अशक्यच आहे. तसेच त्यांच्या सेवेचे मोल पैशात देखील होऊ शकत नाही.
वैद्यकीय क्षेत्रामध्ये परिचारिकांचे महत्व अद्वितीय व अबाधित असून त्यांचे योगदान नक्कीच अमूल्य , अतुलनीय व प्रशंसनीय आहे. त्यांच्याशिवाय वैद्यकीय क्षेत्र पूर्ण होऊच शकत नाही. परिचारिकांच्या सेवा कार्याची नोंद मानवतेच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी केली जाईल. 12 मे या परिचारिका दिनाच्या दिवशी नर्सिंग क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या परिचारिकांना त्यांच्या उत्तम कामगिरीसाठी ‘ फ्लॉरेन्स नाईटिंगेल ‘ या पुरस्काराने सन्मानित केले जाते. रुग्णांची निष्ठेने सेवा करणाऱ्या परीचारिकांबद्दल आदर व कृतज्ञता व्यक्त करण्याचा आजचा हा खास दिवस आहे. आजच्या दिवशी अखंड सेवेचे व्रत घेतलेल्या जगातील सर्व परिचारिकांना , त्यांच्या कार्य कर्तृत्वाला आणि निःस्वार्थ सेवेला आमचा मानाचा मुजरा.
(चारोळी)
‘ नर्स असते सेवेकरी
तिला समजू नका कुणी गुलाम,
नर्सच्या अमूल्य सेवेला
आमचा मनापासून सलाम.’