🙏🏻 पुस्तक एक चांगला मित्र, गुरू व मार्गदर्शक 🙏🏻
लेखक – निलेश पवार (पुस्तक प्रेमी)
अनगाव, ता – भिवंडी, जि – ठाणे.
सर्वप्रथम आपल्या सर्वांना पुस्तक दिनाच्या मनापासून शूभेच्छा.
आज 23 एप्रिल जागतिक पुस्तक दिवस आहे. जगातील सर्वात लोकप्रिय नाटककार , लेखक आणि कवी विल्यम शेक्सपिअर यांच्या जन्म दिवसानिमित्त दरवर्षी 23 एप्रिल हा दिवस ‘जागतिक पुस्तक दिंन ‘ म्हणून साजरा केला जातो. त्या निमित्ताने पुस्तकांचे महत्व सांगणारा हा लेख.
‘प्रसंगी अखंडित वाचीत जावे ‘ ही समर्थ रामदास स्वामींची शिकवण वाचनाचे महत्व विशद करते. ‘ वाचाल तर वाचाल ‘ हे वाक्य अर्थपूर्ण तर आहेच पण ते एक निर्विवाद सत्य देखील आहे.आपल्या जीवनात वाचनाला खूप खूप महत्त्व आहे. खरंच, वाचन करणे ही अतिशय चांगली सवय आहे. वाचनाचे भरपूर फायदे आहेत. म्हणून प्रत्येकाने वाचनाची सवय नक्की लावून घ्यावी. वाचनातून माणसाला ज्ञान, चांगले विचार, प्रेरणा, स्फूर्ती, आत्मविश्वास या अमूल्य गोष्टी प्राप्त होतात. वाचन केल्याने माणूस ज्ञानी, विवेकी, सुज्ञ, व समजदार बनतो. वाचनाने माणसाचे मन विशाल बनते, तसेच माणूस विचारानी सुद्धा श्रीमंत होतो आणि ही विचारांची श्रीमंती तुमच्यापासून कोणीच हिरावून घेऊ शकत नाही.

माणसाचे जीवन सुजलाम – सुफलाम करण्यामध्ये वाचनाचा खूप मोठा वाटा असतो. अखंड वाचन चालू राहिल्यास आपला मेंदू तरुण, तल्लख, तेज, तरतरीत आणि चपळ राहतो. वाचन केल्याने ज्ञानाची कक्षा रुंदावते व आकलनशक्ती वाढते. वाचनाच्या सवयीमुळे माणूस क्षुद्र आणि संकुचित विचारांमध्ये अडकून न पडता उच्च विचारांकडे वळतो. एकदा का ही वाचनाची सवय लावून घेतली की , मग आधी चिंता करणारा माणूस नंतर चिंतन करायला लागतो. वाचन करणारा माणूस भावनेच्या आहारी जाऊन तडकाफडकी चुकीचे निर्णय कधीच घेत नाही तर शांत राहून, सारासार विचार करून आणि हुशारीनेच योग्य निर्णय घेतो. जीवनात प्रगती व विकास करायचा असेल तर वाचन केलेच पाहिजे.
पुस्तकांचे प्रचंड मोठे योगदान आपल्या जीवनात असते. जसे जेवणात मीठ आवश्यक आहे तसेच जीवनात पुस्तके आवश्यक आहेत. पुस्तके हे मित्राप्रमाणे आपले हितचिंतक आणि गुरुप्रमाने आपले मार्गदर्शक असतात. पुस्तके आपल्यावर ज्ञानाचा वर्षाव करतात तसेच आपल्याला अनमोल विचारधन सुद्धा देतात. पुस्तके माणसाला जास्त समजदार व प्रगल्भ बनतात. पुस्तके माणसाला अंधारातून प्रकाशाकडे, निराशेकडून आशेकडे आणि अपयशाकडून यशाकडे घेऊन जातात.
अनेक महापुरुष हे पुस्तक प्रेमी होते. स्वामी विवेकानंद, लोकमान्य टिळक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, डॉ . ए .पी.जे. अब्दुल कलाम, लेखक उत्तम कांबळे या सर्वांना वाचनाचे जबरदस्त वेड होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना पुस्तके हेच खरे जीवा भावाचे स्नेही व सोबती वाटायचे. त्यांना पुस्तकांशिवाय अजिबात करमायचे नाही. पुस्तके वाचल्यामुळेच ज्ञानाचा तेजोभास्कर डॉ. बाबासाहेब आंबेडकर घडला. डॉ. ए. पी. जे . अब्दुल कलाम सांगायचे , ‘ एक चांगले पुस्तक शंभर मित्रांच्या बरोबरीचे असते. पुस्तकांनीच माझे आयुष्य घडवले .’ असं अब्दुल कलाम स्वतः कबूल करतात. बिल गेट्स, वॉरेन बफे, एलोन मस्क ही जगातील सर्वात श्रीमंत माणसेदेखील वेळ काढून आवर्जून पुस्तके वाचतात.
पुस्तके माणसाची मस्तके समृद्ध करतात. प्रेरणादायी पुस्तके वाचल्याने मनातली अडगळ स्वच्छ होऊन मनाचे रंग पालटून जातात.पुस्तके आपल्या बुद्धीला गंज लागू देत नाही आणि माणसाला अधोगतीला जाऊ देत नाहीत. उलट पुस्तके माणसाला प्रगतीच्या आणि यशाच्या मार्गावर घेऊन जातात. माणसाचे जीवन उजळवून टाकण्याचे सामर्थ्य पुस्तकांमध्ये असते. म्हणून आपण कायम पुस्तकांशी मैत्री जोपासली पाहिजे. हिंदीमध्ये एक सुंदर वाक्य आहे , ‘ किताबे आदमी को रद्दी होने से बचाती है! इसलिये अच्छी किताबे पढते रहिये और जिंदगी में आगे बढते राहिये!
🙏🏻 धन्यवाद 🙏🏻
