मुंबई-वडोदरा प्रकल्पातील मोबदला व अतिक्रमण करणाऱ्यांविरोधात कारवाईसाठी शेतकऱ्याची
मागणी

भिवंडी


भिवंडी दि.१८( गावकरी TODAY NEWS ) मुंबई-वडोदरा द्रुतगती महामार्ग प्रकल्पात भिवंडी तालुक्यातील मालबिडी गावातील विष्णू काथोड पाटील या शेतकऱ्याच्या जमिन सर्व्हे नं.६६/७ अ क्षेत्र ६० आर -०० प्रति यापैकी सुमारे ०-५९-१० इतकी जमीन प्रकल्पासाठी संपादित झाली आहे.दरम्यान विष्णू पाटील यांना या क्षेत्रापैकी ०-४८-६३ क्षेत्राचा मोबदला ऑगस्ट २०२० मध्ये मिळाला असून उर्वरित ०-१०-४७ क्षेत्राचा मोबदला मिळणे प्रलंबित आहे.

तसेच या संपादित जमिनीतील एकूण ८५ झाडांचा मोबदलाही मिळालेला नाही.त्यामुळे विष्णू पाटील यांनी २८ डिसेंबर रोजी उपविभागीय कार्यालयात अर्ज दिला आहे.परंतु असे असतानाही विष्णू पाटील आणि त्यांची मुलगी अश्विनी पाटील यांनी वारंवार उपविभागीय कार्यालयात हेलपाटे मारूनही त्यांना मोबदला मिळालेला नाही.तसेच सदर मोबदल्या बाबत उपविभागीय कार्यालयातील वरीष्ठ अधिकारी व संबंधित अधिकारी उडवा उडवीची उत्तरे देत असल्याचा आरोपही विष्णू पाटील यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना दिलेल्या तक्रारी अर्जात केला आहे.तर संबंधित अधिकाऱ्यांनी संपादित जमिनीतील सर्व्हे नं.५६/४/ब मधील जागेतील कब्जा घेण्याचा प्रयत्नही केला,असेही त्यांनी म्हंटले आहे.

तसेच विष्णू पाटील यांच्या सर्व्हे नं.५६/५ पै/ब मालकीच्या संपादीत जमिनीलगत एका कंपनीने अतिक्रमण करून वाढीव खोदकाम केले आहे.सदर कंपनीने कोणतीही नोटीस न बजावता अनधिकृतपणे पोलिसांच्या फौजफाट्यासह उपविभागीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सोमवारी १५ ते १८ फूट उंचीचे खोदकाम करून सुमारे ८ ते १० हजार ब्रास भराव मुरूमाचे उत्खनन करून गौण खनिजाची चोरी केली आहे.दरम्यान अश्विनी पाटील ह्या घटनास्थळी दाखल झाल्या असता त्यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधला.त्यावेळी प्रांत अधिकारी अमित सानप यांनी सकारात्मक उत्तर दिल्यानंतर सर्वजण घटनास्थळावरून पसार झाले.

त्यामुळे भविष्यात सदर जमिनीची नासधूस होणार असून संबंधित कंपनीच्या विरोधात कडक कारवाई करावी अशी मागणी अश्विनी पाटील यांनी उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदारांना एका निवेदनाद्वारे केली आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *