————————————-
भिवंडी 🙁 गावकरी TODAY NEWS ) केंद्र शासन स्तरावरील विविध योजनांची कामे तात्काळ पूर्ण करा अन्यथा कारवाईला सामोरे जा,असे उदगार काढून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक मनुज जिंदल यांनी पंचायत समिती शहापूर येथील शेतकरी भवनात गुरुवारी घेतलेल्या आढावा बैठकीदरम्यान अधिकाऱ्यांना फटकारले.केंद्र शासनाच्या जल जीवन मिशन, स्वच्छ भारत मिशन, प्रधान मंत्री आवास योजना, जनसुविधा, नागरी सुविधा, कर वसुली, पंधरावा वित्त आयोग संदर्भात ६ एप्रिल रोजी आढावा बैठक घेण्यात आली.यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल यांनी अधिकाऱ्यांना पुढील दोन महिन्यांत कामांना वेग देवून लवकरात लवकर कामे पूर्ण करण्याचे आदेश दिले.दरम्यान मोखावणे येथिल ग्रामविकास अधिकारी दिनेश पाकळे यांनी समन्वय साधून प्रयत्नपूर्वक खाजगी जागेत १२ घरांसाठी जमीन उपलब्ध करून दिल्याने त्यांचे कौतुक करून त्यांच्याकडून आदर्श घेऊन कामे उत्तमरित्या पार पाडावीत असे मनुज जिंदल यांनी सांगितले.यावेळी खर्डी ग्रामपंचायत येथिल जल जीवन मिशन योजनेच्या कामाची पाहणी करण्यात आली तसेच काम जलदगतीने करण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले.तसेच खर्डी ग्रामपंचायत अंतर्गत १५ भूमिहीन लाभार्थ्यांना जागा वाटपाची सनद मनुज जिंदल यांच्या हस्ते देण्यात आली.यावेळी जिल्हा परिषदेचे प्रकल्प संचालक छायादेवी शिसोदे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) प्रमोद काळे, कार्यकारी अभियंता पाणीपुरवठा विभाग अर्जून गोळे,शहापूर पंचायत समिती गट विकास अधिकारी भास्कर रेंगडे,सर्व पंचायत समितीचे विभाग प्रमुख, शाखा अभियंता, विस्तार अधिकाऱ्यांसह ग्रामसेवक उपस्थित होते.
