बालसुधार गृहातील अल्पवयीन मुलांचे लैगिक शोषण करणाऱ्या शिक्षिकेवर गुन्हा दाखल

भिवंडी



भिवंडी दि.२३( गावकरी TODAY NEWS ) भिवंडीतील शासनाच्या बालसुधार गृहात धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या बालसुधार गृहातील काही अल्पवयीन मुलांचे सुधारगृहातील ४० वर्षीय शिक्षिकेकडून लैगिक शोषण केल्याप्रकरणी शांतीनगर पोलीस ठाण्यात पोक्सो कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरु केला आहे.भिवंडी शहरातील कचेरीपाडा भागात राज्य शासनाच्या वतीने बालसुधार गृह असून हे बालसुधार गृह भिवंडीतील एका संस्थेमार्फत चालविण्यात येते, विशेष म्हणजे या बालसुधारगृहात असलेल्या मुलांच्या देखभालीसह शिक्षणासाठी अनुदानित संस्था कार्यरत आहे. याच संस्थेच्या वतीने येथील अल्पवयीन मुलांच्या शिक्षणासाठी काही शिक्षकांची नेमणूक करण्यात आली. मात्र या बालसुधार गृहात गेल्या काही वर्षांपासून कार्यरत असणाऱ्या एका चाळीस वर्षीय शिक्षिकाही येथील काही मुलांचे लैगिक शोषण करीत असल्याच्या वारंवार तक्रारी पीडित मुलांकडून केल्या जात होत्या.

त्यातच गुन्हा दाखल झालेल्या शिक्षिकेशी काही कर्मचारी आणि संस्था पदाधिकाऱ्यांमध्ये वाद झाले होते. त्यानंतर सदर शिक्षिकेला तीन महिन्यापूर्वी निलंबित करण्यात आले होते. शिवाय बाल न्यायालयीन आदेशानुसार संबंधित प्रकरणाची जिल्हा महिला बाल विकास विभागाकडून चौकशी सुरु असतानाच, बालसुधार गृहातील मुलांचे लैंगीक शोषण होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. दरम्यान, पीडित मुलांची चौकशी सुरू केल्यानंतर त्यांच्या चौकशीतुन आलेल्या माहितीच्या आधारे निरीक्षणगृह प्रशासनाकडून त्या शिक्षिकेवर शांतीनगर पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरु केला. तर दुसरीकडे पीडित मुलांवर होणाऱ्या लैंगिक शोषण प्रकरणात आणखी एका बालसुधार गृहातील शिक्षिकेचा समावेश असल्याचा संशय जिल्हा महिला बालविकास विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे.या प्रकरणाची सखोल चौकशी सुरु असल्याची माहिती जिल्हा बालसंरक्षण अधिकाऱ्यांनी दिली आहे. मात्र हा धक्कादायक प्रकार समोर आल्याने भिवंडीतील शासकीय बालसुधारगृहात असलेल्या पीडित मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *