*🔸टाळी…🔸*
*टाळी, किती साधे सोपे दोन अक्षर. एका हाताच्या तळव्याने दुसऱ्या हाताच्या तळव्यावर आघात घेल्यावर जो ध्वनी निर्माण होतो किंवा नाद निर्माण होतो ते म्हणजे टाळी. किती साधं आणि सोपं.. नाही का?*
*पण हे इतके सोपे नाही.*
*टाळीचा प्रवास आपल्या जन्मापासून जो सुरु होतो तो अगदी आपल्या अंतापर्यंत सुरू असतो. म्हणजे बघा आपण जन्माला आलो की आपण कुकूलं बाळ असतो. ट्याहां ट्याहां करून भोकाड पसरत असतो. अश्या वेळी आपली आई, आजी, काकी, मामी, मावशी, आत्या आपल्या समोर टाळी वाजवत हसत आपली स्वतःचीच मान वरखाली करत ‘ अल्लेलेे अल्लेलेे काय झालं माझ्या बाळाला…” असं म्हणत त्या टाळीच्या आवाजाकडे आपले लक्ष वेधून घेते. आणि आपण भोकाड बंद करून त्या आवाजाच्या दिशेने डोळे विस्फारून टकमका बघत रहातो. आणि अशा प्रकारे या टाळीचा आपल्या आयुष्यात सर्वात पहिल्यांदा प्रवेश होतो.*
*आपण काही महिन्यांचे झालो की याच बायका आपले दोन्ही इवल्याशा हाताचे पंजे पकडत ते दोन्ही एकमेकांवर हलके हलके आदळत ” विठ्ठल विठ्ठल ….” करायला शिकवते आणि टाळी व तिचा नाद आपल्या शरीरात मुरू लागतो. कधी साधारण एक दीड वर्षाचे लहान बालक पहा. एखादी गोष्ट पाहून ऐकून त्याला आनंद झाला की ते आपोआपच आपले दोन्ही पंजे उगाचच एकमेकांना स्पर्श करत टाळी वाजवायचा प्रयत्न करते पण त्यात नाद नसतो. पण असते एक अविरत निरागसता. एक निखालस आनंद. त्या नुसत्या अव्यक्त टाळीच्या आविर्भावणे आपले मन प्रसन्न होऊन जाते. टाळीचे बाळकडू येथे अंगात मुरत असते.*
*आपण शाळेत गेलो की टाळी प्रगल्भ होते. शिक्षक त्याच्याकडे लक्ष वेधण्यासाठी टाळीचा वापर करतात. एखाद्याला प्रोत्साहन द्यायला टाळी वाजवावी हा संस्कार आपल्यात भिनवला जातो. एखाद्याचे भाषण झाल्यावर किंवा एखादा कार्यक्रम झाल्यावर किंवा कोणाच्यातरी स्वागतासाठी आपल्याला टाळी वाजवण्यास शिकवलं जातं. टाळीला आता भाषा आणि भाव समजू लागतात.*
*पण मला आवडते ती दिलखुलास टाळी. कधी शाळा कॉलेजच्या कट्ट्यावर किंवा वर्गात बेंचवर दिलखुलास गप्पा मारत बसलेले काही मित्र मैत्रीणी पहा. टिंगलटवाळी, मस्ती करत जेंव्हा आनंदाची एक परिसीमा येते तेंव्हा ते अगदी मनापासून एकमेकांना टाळी देत हसतखेळत असतात. ते दृश्य मनाला भावून जात .खळखळून हसत एखाद्या आवडलेल्या गोष्टीवर किंवा विनोदावर हे तरुण तरुणी जेंव्हा एकमेकांना भरभरून दिलसे टाळी देतात ना ते पाहून आपल्याही अंगात उत्साह भरतो. आपणही काही वेळ तरूण झाल्यासारखा वाटतं.*
*याच तरुणतरुणी मधलं मग एखादं जोडपं. एक मित्र एक मैत्रीण अशी टाळी एकमेकांना देता देता टाळीचा तो हात एकमेकांच्या हातात घट्ट धरून ठेवतात आणि मग त्यांची काही दिवसात लग्नाची टाळी वाजते.*
*सहसा टाळी वाजवली जाते डाव्या हाताच्या पंजाच्या तळव्यावर वर उजव्या हाताच्या चार बोटांच्या पंजाने आघात केल्यावर. काही लोक त्याच्या उलटही वाजवतात म्हणजे उजव्या हाताच्या पंजावर डाव्या हाताने आवाज करत.या टाळीचे प्रकार पण भरपूर. लहान मुलांच्या छोट्या छोट्या पंजाची न वाजणारी टाळी. तरुण पोरांची उत्साही टाळी. तर वयस्कर लोकांची अलगद एकमेकांना कसाबसा स्पर्श करत एक अबोल अनुभवी टाळी.*
*मोठ्या खड्या आवाजात आरती म्हणताना एकपटीत किंवा दिडपटीत किंवा दुपटीने ज्याला जशी जमेल, आवडेल तशी वाजणारी टाळी त्या आरतीला एक संगीत अर्पण करते. तिथे कुठल्याही वाद्याची कमतरता ही टाळी भासू देत नाही. कुठल्याही कलाकाराला त्याच्या कलेला टाळ्यांच्या आवाजात मिळणारा प्रेक्षकांकडून प्रतिसाद हा कुठल्याही पुरस्कारापेक्षाही मोठा असतो. या टाळ्यासाठी तो भुकेला असतो. टाळ्यांच्या आवाजाने त्याचा उत्साह अधिकच द्विगुणीत होतो.*
*एखाद्या कार्यक्रमात कोणा मान्यवराच स्वागत टाळ्यांच्या कडकडाने होणे म्हणजे त्याला दिलेली ती मानवंदना ….त्याचा तो मानसन्मानच. राजकारणात मात्र एकाच पक्षातील किंवा भिन्न पक्षांतील नेत्यांनी एकमेकांना दिलेली टाळी लगेच चर्चेचा विषय बनून जाते. या टाळीचे भलेभाले अर्थ लावले जातात.*
*ते समजून घेणे आपल्या सारख्या सर्वसामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर असते त्याबाबतीत आपण लांब राहिलेलंच बरं.*
*पंढरपूर वारीत दिंडीत चालणाऱ्या टाळकऱ्यांना खूप महत्व असते. पण याच टाळकऱ्यांच्या मागे त्याच ठेक्यात आपली टाळी वाजवत अभंग गात चालणारे वारकरी मन भावुक करून जातात. वाढदिवसाला आपल्या जवळच्या लोकांच्या टाळ्यांच्या आवाजात केक कापतानाचा आनंद काही औरच असतो नाही.*
*भांडणात पण या टाळीला आपण सोडत नाही. कोणाची बाजू खरी आणि कोणाची खरी असा प्रश्न आला की दोन्ही बाजूने बोलले जाते…” एका हाताने कधी टाळी वाजते का..? ” या टाळीला उगाचच त्या भांडणात किंवा वादात गोवले जाते.*
*अजय अतुलच्या एका नवरानवरी गाण्यात तर संपूर्ण संगीत या टाळ्यावर आधारलेलं आहे…खुद्द ए.आर. रहेमान यांना सुद्धा या टाळ्यांचा मोह टाळता आलेला नाही. सुरुवातीच्या काही गाण्यात त्यांनी याच टाळ्यांचा वापर बखुबीने केला आहे.*
*टाळी ही आपल्या आयष्यात कायम नाद रुपात घर करून असते. सकाळच्या काकड आरती पासून ते संध्याकाळी दूर मंदिरातून येणाऱ्या अभंगाच्या आवाजा बरोबर या टाळीचा ध्वनी आपल्या कानात पिंगा घालत असतो.*
*तृतीय पंथी जी टाळी वाजवतात त्यामागे पण एक शास्त्र आहे.. त्यांची टाळी वाजवण्याची पद्धत जरा वेगळी. खरं त्याची या त्यांच्या टाळीमुळे अवहेलना केली जाते जे मनाला पटत नाही. तुमच्या आमच्या सारखीच ती माणसाचं ना, पण काही अपवादात्मक शाररिक मानसिक रचनेमुळे त्यांची अवहेलना करणं मला तरी पटत नाही. मी नेहमी या लोकांचा सन्मान करत आलोय. आणि सन्मान करत राहिलं. असो.*
*आयुष्याची शेवटची घटिका आली की या टाळीचा नाद कमी कमी होऊ लागतो. शरीर मन कोणीच साथ देत नाही आणि टाळी बंद होऊ लागते.*
*आपलं पार्थिव स्मशानाकडे जातं असतं आणि आपल्या मागे चार दोन जण ‘जय जय राम कृष्णहरी’ म्हणत हलक्या आवाजात आपल्यासाठी शेवटची टाळी वाजवत असतात. आपल्या आयुष्याच्या प्रवासातली ही शेवटची टाळी !*
