अँड्रॉइड फोन काय करतो ?

लेख

एखादे उपकरण किंवा एखादी सुविधा उपलब्ध झाली की तिचा विकास होत तीच्या मार्फत अधिकाधिक सुविधा सेवा मिळाव्यात अशी इच्छा होत राहते. टीव्ही आला, तेव्हा तो कृष्णधवल होता. एकच वाहिनी होती. दिवसातून तीन चार तासच कार्यक्रम प्रक्षेपित होत. मग रंगीत झाला, अनेक वाहिन्यांचे कार्यक्रम प्रक्षेपित होऊ लागले. दिवसाचे चोवीस तास, आठवड्याचे सातही दिवस कार्यक्रम मिळू लागले. मग तो टेबलावर न ठेवावा लागता भिंतीवर लटकवता येऊ लागला. आता त्याला डिव्हिडी प्लेअरची जोड मिळाली. त्यात इंटरनेटचाही समावेश झाला. तो त्रिमितीही झाला. एक ना अनेक.

मोबाईल फोनच्या बाबतीतही तशीच परिस्थिती उद्भवली. केवळ ध्वनीच नाही तर लेखी संदेश दृश्य चित्र तेही चलचित्र त्याच्या माध्यमातून पाठवणे शक्य होऊ लागले. त्याचा हा विस्तार वाढविण्यासाठी मग त्यातच इंटरनेटचाही अंतर्भाव करण्यात आला. त्यासाठीच गुगल या कंपनीने अँड्रॉइड नावाची एक नवीन मंत्रावली, सॉफ्टवेअर विकसित केले. ते त्या फोनचे नियंत्रक म्हणजेच ऑपरेटिंग सिस्टीम बनले आहे.

या मंत्रावलीवर चालणाऱ्या मोबाइल फोनला अँड्रॉइड फोन असे म्हणतात. ही मंत्रावली ज्याच्या आधारावर बनवली गेली आहे ती सांकेतिक भाषा, कोड, गुगलने गुप्त न ठेवता सर्वांसाठी खुले केले आहे. त्यामुळे मग त्याच्याशी सुसंगत अशा अनेक नवनवीन सेवा, खेळ तयार करणे शक्य होऊ लागले. त्यातच गुगलने तर अशी नवनवीन ॲप्लिकेशन्स तयार व्हावीत याला उत्तेजन द्यायलाच सुरुवात केली. त्यामुळे मग या अँड्रॉइड फोनची व्याप्ती दिवसागणिक वाढू लागली. नवनवीन अॅप्लिकेशन्स तयार झाली कि तीही विनामूल्य आपल्या फोनवर उतरवून घेण्याची सुविधाही मिळू लागली. साधा फोन स्मार्टफोन बनला.

आता या अँड्रॉइड फोनचा वापर केवळ संभाषणापुरता किंवा एसएमएसपुरता मर्यादित राहिलेला नाही. त्याच्या माध्यमातून चलचित्र तर पाठवता येतातच, पण त्याचा उपयोग व्हिजिफोनसारखा म्हणजेच ज्याच्याशी बोलायचे त्याची छबी फोनवर दिसू शकेल अशा रीतीने संभाषण करता येते. समोरासमोर उभे राहून एकमेकांशी बोलण्याचे समाधान देऊ शकते. या फोनमधून इंटरनेटची संपूर्ण सुविधा, ई मेल सकट उपलब्ध होते. त्यामुळे मग घरापासून दूर असतानाही ई मेल मिळत राहते. आपल्या घरचा संगणक ज्या ज्या गोष्टींसाठी वापरला जातो त्या सर्व आता या हातात मावणाऱ्या अँड्रॉइड फोनवर करता येतात. एवढेच काय पण काही वर्तमानपत्रे, पुस्तके या फोनवर मिळू शकतात. ऑफिसमध्ये जाता जाता वर्तमानपत्र वाचता येते. प्रवासात पुस्तके वाचून अभ्यास करता येतो. यूट्यूबसारख्या सुविधांमधून क्रिकेटचा सामनाही पाहता येतो. थोडक्यात सार्‍या जगाशी सततचा संपर्क साधता येतो.

डाॅ. बाळ फोंडके यांच्या ‘काय ?’ या पुस्तकातून लेख

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *