*संकलन- सदानंद पाटील, रत्नागिरी.*
*——————————————–*
*महाराजांचे रूपवर्णन हे अलौकिक सामर्थ्यवान आहे. प्रत्यक्ष भगवान दत्तात्रयांचे सगुण असे हे रुप होय. ज्यांनी ज्यांनी श्री गुरूस पाहिले, ते ते लोक महापुण्यवान व भाग्यवान ठरले. प्रत्यक्ष दत्तात्रय, ईश्वर सगुण अशा मानवी रूपात जनलोकात वावरले. किती विलक्षण ही त्या भगवंताची लीला…!*
*अक्कलकोट नगरीत श्री स्वामी समर्थ आले आणि खंडोबाच्या मंदिरातील कट्ट्यावर स्थानापन्न झाले. तेथून पुढे चोळाप्पाचे घर व पुढे वटवृक्षाखाली येऊन जनकल्याणाची तपसाधना त्यांनी सुरू केली. लोकशंका निरसनाचे कार्य त्यांनी आरंभिले. आपल्या अक्कलकोटच्या वास्तव्यात त्यांनी अनेक चमत्कार करून लोकांना सन्मार्गाला लावले. राजापासून ते थेट सामान्य जनांपर्यंत श्री स्वामी समर्थांनी कृपा केली.*
*महाराजांचे प्रकट वास्तव्य एकूण ४० वर्षांचे असून (शके १७६० ते शके १८००) त्यातील २२ वर्षे महाराजांनी अक्कलकोट व त्या परिसरात वास्तव्य केले.*
*या बावीस वर्षांच्या काळात महाराजांनी अक्कलकोट नगरीस इंद्राच्या नगरीसारखी शोभा आणली, व आजही ही शोभा कायम आहे. काशीपासून ते रामेश्वर पर्यंतचे लोक स्वामींच्या दर्शनासाठी अक्कलकोटास येत असत. त्यांची भक्ती पाहून श्रीस्वामी दयाघन त्या भक्तांचा उध्दार करीत असत, आणि महाराज काही चमत्कार ही त्यांना करून दाखवीत असत.*
*श्रींच्या दर्शनासाठी आर्त, जिज्ञासू, अर्थार्थी व ज्ञानी असे चार प्रकारचे लोक येत असत. यामध्ये संकटात पडलेले लोकच जास्त असत. द्रव्यादी, स्वार्थी, अशी येणाऱ्यांची संख्याही मोठ्याप्रमाणात असे. जिज्ञासू व ज्ञानी लोक फार कमी प्रमाणात येत. ते सर्वांच्या मनोकामना पूर्ण करीत असत. श्रीस्वामी समर्थांच्या चरण सानिध्यात नेहमी वास्तव्य करून राहावे, अशी श्री समर्थांची मनमोहक मूर्ती होती.*
