दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी होणारा भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेचा लोकशाही दिन दि.०६/०२/२०२३ सकाळी ११:०० वा. तिस-या मजल्यावरील मा. आयुक्त सो सभागृहांमध्ये मा.आयुक्त श्री विजयकुमार म्हसाळ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यामध्ये प्रभाग समिती क्र. ४ मधील अनाधिकृत बांधकामासंबंधीची १ तक्रार प्राप्त झाली होती. सदर तक्रारी अर्जावर कायदेशिर कार्यवाही करण्याचे स्पष्ट आदेश मा. आयुक्त साहेब यांनी संबंधित प्रभाग अधिकारी यांना दिले.
सदर बैठकीत करदात्यांना शास्तीमध्ये व्याजामध्ये १०० टक्के माफीची दिनांक १७ फेब्रुवारी २०२३ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून सदर वाढीव अभय योजनेचा लाभ भिवंडीतील सर्व करदात्यांनी घेऊन आपला मालमत्ता कर तात्काळ महानगरपालिकेच्या प्रभाग समिती निहाय कार्यालयामध्ये भरावा आणि होणारी कार्यवाही टाळावी असे आवाहन प्रशासक तथा आयुक्त विजयकुमार म्हसाळ यांनी केले आहे.
तसेच शासन परिपत्रकातील निर्देशानुसार महानगरपालिका स्तरावरील लोकशाही दिनी नागरीकांची निवेदने लोकशाही दिनाच्या दिवशी न स्विकारता, लोकशाही दिनाच्या १५ दिवस आधी निवेदने तक्रारी तीन प्रतीत महानगरपालिकेच्या कार्यालयांत जमा करणे अत्यंत आवश्यक आहे. त्यानुसार पुढील लोकशाही दिन दि.०६/०३/२०२३ रोजी सकाळी १०:०० वा. महानगरपालिकेच्या मुख्यालयातील तिस-या मजल्यावरील मा. आयुक्त यांचे सभागृहामध्ये लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आलेले असून, नागरीकांनी आपले तक्रारी अर्ज/निवेदने १७ फेब्रुवारी २०२३ पूर्वी महानगरपालिकेच्या माहिती व जनसंपर्क विभागामध्ये सादर करावेत..
निवेदन दाखल करताना अर्जदाराने आपले अर्ज तीन प्रतीत प्रपत्र १ (ब) प्रत्येक निवेदनासोबत सादर – करणे आवश्यक असून, सदरचे नमुने माहिती व जनसंपर्क विभागामध्ये उपलब्ध आहेत. अर्जदाराने एका अर्जात एकच तक्रार सादर करावी, एकापेक्षा जास्त तक्रारी असलेला अर्ज स्विकारला जाणार नाही. त्याचप्रमाणे आस्थापना विषयक, विविध न्यायालयांत, लोकआयुक्त यांच्याकडे प्रलंबित असलेल्या प्रकरणाच्या तक्रारी, माहिती अधिकार कक्षेत येणारी प्रकरणे, तसेच राजकिय पक्षांच्या नगरसेवकांच्या, संस्थाच्या लेटरहेडवरील अर्ज किंवा तक्रार वैयक्तिक स्वरुपाची नसेल, तर अर्ज स्विकारले जाणार नाहीत असे महानगरपालिकेच्या वतीने कळविलेले आहे.
(सुनिल झळके), माहिती व जनसंपर्क अधिकारी, भिवंडी निजा. शहर महानगरपालिका.
