भिवंडी शहरालगत असलेल्या खोणी ग्रामपंचायत हद्दीतील तळवळी नाका भागात घरत कंपाउंड मधील भंगाराच्या गोदामात केमिकलचा ड्रमचा झालेल्या स्फोटात दोन जणांचा मृत्यू झाला असून गोदाम आगीच्या भक्षस्थानी पडले. अचानक झालेल्या या स्फोटाबाबत परिसरात चर्चेचे मोहोळ उठले असून पोलिसांनी देखील या घटनेची दाखल घेत तपास सुरु केला आहे.
रमजान मोहम्मद जमील कुरेशी (४५) व मोहम्मद इस्राईल शेख (३५) असे स्फोटात जागीच ठार झालेल्या दोघाची नावे आहेत. त्यापैकी रमजान कुरेशी हा गोदामचा मालक होता. ते दोघे उघड्यावरच भंगारच्या गोडाऊनमध्ये केमिकलचा वापर करून पिशव्या धुण्याचे काम करीत होते. त्यापैकी एकाला बिडी ओढण्याची तलफ लागल्याने त्याने बिडी पेटवून केमीकलच्या ड्रमची साफसफाई सुरु केली. दरम्यान बिडीची ठिणगी त्या केमीकल ड्रममध्ये पडल्याने ड्रममधील रसायनाचा संपर्क झाल्याने त्याचा स्फोट झाला. हा स्फोट इतका भीषण होता की हे दोघे मृत व्यक्ती हवेत उडून दूरवर फेकली गेली आणि त्यांचा मृत्यू झाला. तसेच आजूबाजूच्या इमारतींमधील खिडक्यांच्या काचा फुटल्या. घटनास्थळी भिवंडी मनपाच्या अग्निशमन दलाने हि आग नियंत्रणात आणली. तर निजामपूर पोलिसांनी दोघांचे मृतदेह ताब्यात घेऊन स्व. इंदिरागांधी जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल केले. या प्रकरणी आकस्मित मृत्यू म्हणून पोलिसांनी नोंद केली आहे. वास्तविक भिवंडी आणि परिसरात विविध कंपन्यांतून रिकाम्या केमिकलच्या ड्रमचा साठा भंगाराच्या गोदामात केला जातो. मात्र त्यामधील केमिकल बाबत माहिती नसल्याने शहरातील विविध ठिकाणी बेकायदेशीरपणे साठविलेल्या रसायनाच्या ड्रमच्या दुर्घटना घटना अनेकवेळा घडल्या आहेत. मात्र या दुर्घटने प्रकरणी पोलीस उपयुक्त नवनाथ धावले यांनी पोलीस अधिक तपास करीत असल्याची माहिती दिली.
